दौंड : बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणुका पार पडल्यानंतर दौंड तालुक्यातून खासदर सुप्रिया सुळे यांना अनपेक्षित यश मिळाले. यामुळे अनेक जण दौंडचा भावी आमदार आपणच, असे स्वप्न पाहू लागले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर दौंड मध्ये आगामी विधानसभेची काहींनी जोरदार तयारी केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक वर्षाचे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या कुल-थोरात हे लोकसभा निवडणुकीमध्ये एकाच महायुतीच्या गटात असल्यामुळे दौंडच्या संदर्भात अजित पवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सध्या तरी आजी-माजी आमदारांना अजित पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे.
तरीही आमदार राहुल कुल यांनी आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचा शुभारंभ आणि उद्घाटनाचे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात केले. आमदार कुल हे पुन्हा तिसऱ्यांदा विधानसभेला सामोरे जाऊन आमदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार रमेश थोरात यांची मात्र गोची झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट या गटाकडून उमेदवारी नाही मिळाली तर आपक्ष लढण्याची तयारी त्यांनी चालू केली असल्याची त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.
राष्ट्रवादी पक्षात फाटाफूट झाल्यानंतर आता रमेश थोरात किंवा त्यांच्यासमवेत पक्षातून अजित पवारांच्या गटात गेलेल्या कोणालाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात घेण्यास थेट नकार दिल्याची चर्चा दौंड तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि भाजपला रामराम ठोकून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नामदेव ताकवणे, दिग्विजय जेधे, राजाभाऊ तांबे, वंदना मोहिते,असे अनेक जण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार तयारी चालू केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे दौंड मधून ओबीसी उमेदवार देण्यासाठी चाचपणी करीत असल्याचीही तालुक्यात चर्चा चालू आहे.