छत्रपती संभाजीनगर : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी मतदार संघासोबतच उमेदवारांची सुद्धा चाचपणी सुरु झाली आहे. कोणत्या भागातून कोणता उमेदवार द्यायचा यावर स्पर्धा सुरु झाली आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भूमरेंसह आमदार संजय शिरसाटांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे दोन दिवसापूर्वी बोलले होते कि विधानसभा निवडणूक लढणार आणि गद्दारांना हरवणार, याविधानानंतर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी खैरेंना घेरलं आहे.
चंद्रकांत खैरेंची हौस अजून फिटली नाही, त्यांनी फक्त पश्चिम मतदार संघातून उमेदवारी आणून दाखवावी असे चॅलेंज संदिपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांना दिलं आहे. त्यानंतर आपण बघू की कोण कोणाला काढतं? खैरे यांनी उमेदवारी मिळवली तरच त्यांचे मातोश्रीवरच वजन किती आहे हे समजेल. असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भूमरे आणि आमदार संजय शिरसाट बोलत होते.
तरच त्यांचं मातोश्रीवर वजन..; संजय शिरसाट
खैरेंनी आधी त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत, ज्यांनी त्यांना दोनवेळा पराभव केलाय त्यांचा बंदोबस्त करावा असं म्हणत आमच्या बरोबर नाही आधी त्यांच्याबरोबर तुम्हाला लढावं लागेल असे शिरसाट म्हणाले. त्यांनी उमेदवारी मिळवली तरच त्यांचं मातोश्रीवर वजन आहे हे सिद्ध होईल. अन्यथा त्यांचं वजन संपलं म्हणायला काही हरकत नाही असे शिरसाट म्हणाले.
त्यातच तुमची पात्रता समजेल..: संदिपान भूमरे
चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळवून दाखवण्याचं चॅलेंज करत संदिपान भूमरे म्हणाले, तुम्ही फक्त उमेदवारी आणा त्यातच तुमची पात्रता समजेल आणि त्यानंतर तुम्हाला सांगू की संजय शिरसाट काय आहे म्हणून. खैरे यांची हौस ही फिटूच शकत नाही. त्यांनी आता फक्त नेतेगिरी करावी असा माझा त्यांना सल्ला आहे. कारण खैरे यांना आता मातोश्रीवर सुद्धा कोणी विचारत नाही आणि त्यांना उमेदवारीच भेटू शकत नाही. जर यदाकदाचित खैरे उभे राहिले तर आम्ही खैरेच डिपॉझिट जप्त करू. असं शिरसाट म्हणाले.