पुणे : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १० संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उर्वरित ११ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनची सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघातून मुंबई-कोकण विभागातून सिद्धार्थ कांबळे, पुणे विभागातून दिगंबर दुर्गाडे, नाशिक विभागातून गुलाबराव देवकर, औरंगाबाद विभागातून अर्जुनराव गाढे आणि अमरावती विभागातून वसंत घुईखेडकर बिनविरोध निवडून आले आहेत.
ब- नागरी सहकारी बँक मतदारसंघातून पुणे विभागातून सुभाष जोशी आणि भाऊ कड, नागपूर विभागातून रवींद्र दुरगकर, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून संजय भेंडे, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विश्वास ठाकूर बिनविरोध झाले आहेत.
दरम्यान, असोसिएशनच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक हि ११ जागांसाठी २२ नोव्हेंबरला होणार आहे. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत, तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.
तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होऊन लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे. तर या निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत सातपुते काम पाहत आहेत.