लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक ठिकठिकाणी अडकले आहे. यातच लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीने रौद्र रूप धारण केले असून तिचे बॅक वॉटरचे पाणी आज गुरुवारी (ता.२५) रेल्वे पुलाला खेटले आहे. त्यामुळे एमआयटी शिक्षण संकुलात शिक्षण घेणारे हजारे विद्यार्थी अडकले आहेत.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी या शौक्षणिक संकुलनाचे उदघाटन २० वर्षापूर्वी करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर, प्रसिध्द मराठी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, विद्यमान खासदार सुनेत्रा पवार व अनेक मान्यवर आले होते. त्यावेळीसुद्धा अशाच प्रकारे मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. व नदीच्या बॅक वॉटरचे पाणी रेल्वे पुलापर्यंत खेटले होते आणि लोणी काळभोर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व गाड्या पुरात बुडाल्या होत्या. तर या पुरात लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सुनेत्रा पवार हे तिघेजण अडकल्यानंतर त्यांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या पुराचीच प्रचीती आज लोणी काळभोरकरांना आली आहे. व २० वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणी आज पुन्हा एकदा ताज्यातवान्या झाल्या आहेत.
लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे बॅक वॉटरचे पाणी रेल्वे पुलापर्यंत आले आहे. हजारो विद्यार्थी कॉलेज, बस व वसतिगृहात ३ तासाहून अधिक काल अडकले आहेत. पाउस कधी बंद होईल आणि पुराचे पाणी कधी कमी होईल? याची वाट पाहत बसले आहे.