कोल्हापूर : ‘आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य मोहोळचे आमदार राजन पाटील यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सभेत केले.
सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून यात मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार राजन पाटील व भाजपचे खासदार धनंजय महाडिक असा सामना रंगत आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील याची जीभ घसरली. पाटील यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे चित्र आहे. राजन पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे दुसरे नेते उमेश पाटील यांनी देखील टीका केली आहे.
खासदार महाडिक यांनी प्रचार करताना राजन पाटील यांच्या मुलांना, ‘बाळांनो असे बोलू नका’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजन पाटील यांनी मुक्ताफळे उधळली आहेत.
‘आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले.
तसेच आमच्या पोरांना वयाच्या १७ व्या वर्षीच ३०२, ३०७ ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं आहे.
टाकळी सिकंदर येथील प्रचाराच्या अंतिम सभेत बोलताना राजन पाटील यांनी महाडिकांवर जहरी टीका केली. त्यामुळं आता राष्ट्रवादी या नेत्यावर काय कारवाई करणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
राजन पाटलांचं वक्तव्य हे महिलांचं अपमान करणारं आहे. स्वत:च्या पोरांना लग्नाअधीच पोरं झाली आहेत, असं सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? असे म्हणत उमेश पाटील यांनी राजन पाटलांचा समाचार घेतला.