पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे सादरीकरणही करण्यात आलं आहे. याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लाडकी बहिण योजनेत आता 6 नवे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येईल.
अनेकांना अर्ज करताना काही अडचणी येत होत्या. त्यात सुलभता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विशेष करून नवविवाहीत महिलांना विवाह नोंदणीवरून अडचण येत होती. याची दखल सरकारने घेतली आहे. त्यानुसार कॅबिनेटमध्ये निर्णय घेवून सहा नवीन अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.
लाडकी बहिण योजनेतील 6 नवे बदल…
1) पोस्ट बँक खाते असल्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे.
2) दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्रातल्या पुरूषा बरोबर लग्न केल्यास पतीच्या कागदपत्रावर तिला लाभ मिळेल
3) गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार, त्यात बदलही केले जाणार
4) केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही यापुढे लाभ मिळणार
5) नवविवाहीत महिलेची नोंदणी शक्य नसेल, तर पतीचे रेशनिंग कार्ड ग्राह्य धरणार
6) ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार आहे.
या नव्या नियम आणि अटींमुळे अर्ज करण्यात सुलभता येईल अशी आशा सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
लाडकी बहिण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र अर्ज करताना अनेक अडचणी येत आहे. त्या येवू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्टदरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहे.