पिंपरी : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली होती. त्या आरोपींची सुटका करण्यासाठी वकिलाने बनावट जामीन पोलिसांना सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी वकीलासह इतर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडे दहा ते सहा वाजण्याच्या दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पिंपरी न्यायालय येथे घडला होता.
याबाबत राहुल बबन बनसोडे (रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी शुक्रवारी (दि.19) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला जामीन देण्यासाठी कर्टात हजर असलेले वकील आणि आरोपीच्या जामीनासाठी वकीलाच्या संपर्कात असलेले व्यक्ती (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली होती. आरोपींच्या सुटकेसाठी न्यायालयाने स्थानिक जामीनदार, नातेवाईक आणि त्यांचे फोन नंबर सादर करायला सांगितले होते. आरोपींनी फिर्यादी यांचे बनावट आधार कार्ड तयार करुन ते न्यायालयात सादर केला. तसेच वकीलांमार्फत जामीन घेऊन तो पोलिसांना सादर केला. परंतु, फिर्यादी बनसोडे हे स्वत: न्यायालयात हजर नसतानाही त्यांच्या आधार कार्डचा वापर करुन आरोपींना जामीन देऊन न्यायालय व फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, राहुल बनसोडे यांनी आरोपींच्या जामिनाबाबत न्यायालयात जाऊन चौकशी केली असता फिर्यादी यांचे आधार कार्ड न्यायालयात स्थानिक जामिनदार म्हणून सादर केल्याचे निदर्शनास आले. मात्र, बनसोडे यांनी अशा प्रकारचे कोणतीही कागदपत्रे आरोपींना दिली नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर बनसोडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.
यावरून आरोपींना जामीन मिळवून देण्यास मदत करणाऱ्या वकीलावर आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय रविंद्र मुदळ करत आहेत.