भिगवण: गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील मच्छीमारांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. उजनी जलाशयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी मत्स्य बीज सोडले जाणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतची मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज (दि. २०) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. पालकमंत्री अजित पवार यांनी या मागणीला तत्काळ ग्रीन सिग्नल दिला.
या निर्णयानंतर इंदापूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यातून मच्छीमार बांधवांचा रोजगाराचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीवरून तालुक्यातील मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता.
यावर्षी देखील शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी केली. पवार यांनी भरणे यांच्या मागणीवरून तत्काळ मत्स्यबीज सोडण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याने तालुक्यातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.