पुणे : राज्यात सद्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्याता आता विदर्भात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. गेल्या 24 तासात गडचिरोलीच्या सिरोंचा भागात तब्बल 183 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिरोंचात ढगफुटी पाऊस झाल्याने नदी नाल्याला पूर आला होता. यानंतर एका शाळेत अडकलेल्या 75 विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
‘या’ भागात जनजीवन विस्कळीत
विदर्भातील गडचिरोली, भंडारा व नागपूर या जिल्याच्या काही भागात पूर परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल व नदीकाठावरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबर्डी भागात गेले दोन तास दमदार पाऊस होत आहे. विजांच्या कडकडाटासह पहाटेपासून पाऊस सुरू आहे.