शिरूर : काही दिवसांपूर्वी शिरूर न्यायालयाच्या आवारात एका माजी उपसरपंचाने दारु पिऊन धिंगाणा घालून शिविगाळ करण्याची घटना ताजीच असताना आता पुन्हा न्यायालयासमोर मित्र मैत्रिणीमध्ये हाणामारी झाल्याची घटना दि. १८ जुलै रोजी घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे दिसून आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २२ वर्षीय महीलेचे (रा. श्रीरामपुर अ. नगर सध्या रा. शिक्रापुर ता. शिरूर) लग्न २०२० साली राजेंद्र जाधव यांचे सोबत झाले. ती सध्या त्याच्या सोबत राहात नसुन ती आईवडील यांच्याकडे राहण्यास असते. दि. १८ जुलै रोजी ती घटस्फोटाच्या संदर्भाने शिरूर कोर्टात सायंकाळी ५ वा. च्या दरम्यान तिच्या ओळखीचा विजय मछिंद्र निकम रा. श्रीरामपुर दत्त्तनगर या मित्रासोबत आली होती. कोर्टात यायला वेळ लागल्याने ती त्याला अजुन थोडा वेळ थांब असे म्हणाली. त्यानंतर ती आल्यानंतर मित्राने रागात कोर्टाच्या आवारातच मारहाण केली. त्यावेळी तेथे आजूबाजूचे लोक जमा झाले.
त्यानंतर तेथील पोलीस व वकील तिला व विजयला बाजुला घेवुन गेले. थोड्या वेळात महिला पोलीस व इतर पोलीस त्याठिकाणी आले. त्यांच्या सोबत ती शिरूर पोलीस स्टेशन येथे आले. तीच्या ओळखीचा विजय मछिंद्र निकम रा. श्रीरामपुर दत्तनगर ता श्रीरामुपर जि अनगर याने रागाचे भरात मला चापट मारली असुन माझी त्याच्या विरूदध काही एक तक्रार नसल्याचा जबाब तिने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दिला आहे. विजयवर महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ अन्वये ११०, ११२, ११७ प्रमाणे खटला भरुन कारवाई करण्यात आली आहे.
शिरूर पोलीस स्टेशनचा बेजबाबदार आणि भोंगळ कारभारावर नागरिक नाराज असून शिरूर पोलीस स्टेशन येथे सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. सर्वसामान्य नागरिक शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी कि शिरूर पोलिसांची तक्रार करावी असा संभ्रम घेऊन वावरत आहेत. अशी खोचक प्रतिक्रिया अॅड. सुमित देवीदास पोटे यांनी दिली आहे.