नवी दिल्ली : जर तुम्हीही व्हॉट्सॲप यूजर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. सध्या व्हिएतनाम या देशातील हॅकर्सकडून भारतीय व्हॉट्सॲप युजर्संना लक्ष्य केले जात आहे. यासाठी हॅकर्सने मोठा ट्रॅप लावला आहे. सायबर सिक्युरिटी एजन्सी ‘क्लाउडसेक’ने याबाबतची माहिती दिली आहे. भारतात ई-चलान घोटाळा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यामागे व्हिएतनामचे हॅकर्स असल्याचे सांगण्यात आले.
‘क्लाउडसेक’ने म्हटले आहे की, या APK फाईलमध्ये माओरिसबॉट नावाचा मालवेअर आहे, ज्याचा वापर व्हिएतनाममधील हॅकर्स मोठ्या प्रमाणावर करतात. काही दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनीही या घोटाळ्याबाबत लोकांना सतर्क केले आहे. मेसेजसह आलेल्या APK फाईलवर युजर्सने क्लिक करताच, माओरिसबॉट त्याच्या फोनवर डाउनलोड होतो.
एकदा इन्स्टॉल केल्यानंतर, हे ॲप कॉन्टॅक्ट लिस्ट, फोन कॉल्स, मेसेज इत्यादी अनेक ॲप्समध्ये शिरकाव करत आहे. हे OTP वर देखील लक्ष ठेवते. याशिवाय, ते युजरच्या ई-कॉमर्स खात्यांवर लक्ष ठेवते आणि गिफ्ट कार्ड स्वयंचलितपणे खरेदी करते. हा मालवेअर फोनमध्ये कोणत्याही प्रकारचा शोध न घेता राहू शकतो.