बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील काही तरुण अपार श्रद्धेपोटी मागील 25 वर्षापासून गुळपोळी ते अक्कलकोट पायी प्रवास करीत दर्शनाला जातात. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जय घोषात गुळपोळीतील स्वामी भक्तांची पायी दिंडी अक्कलकोटच्या दिशेने आज गुरुवारी (ता. 18) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रवाना झाली. यावर्षीही गुळपोळीतील 80 व त्यापेक्षा अधिक तरुण एकत्रित श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघाले आहेत.
पायी वारी म्हटले की, निरंतर मंदिर मार्गावर चालत राहणे, देवाचे नामस्मरण करणे, भक्तीगीते गाणे, देवाचा जयघोष करणे या सर्व गोष्टींचा तर आपोआप समावेश होतोच. पण या तरुणांच्या भक्तीचा वेगळेपणा म्हणजे वारी माध्यमातून एकत्रित होऊन वारी खंडित होऊ न देणे. मागील 25 वर्षांपासून श्री स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गुळपोळी ते अक्कलकोट पायी दिंडी काढली जाते.
या पालखीची सोहळ्याची सुरुवात 1999 साली करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीला स्वामी भक्तांनी पहिली वारी हि सायकलवर करून अक्कलकोट गाठले होते. हळूहळू प्रत्येकवर्षी बदल होत गेला. त्यानंतर काही भक्तांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून 8 ते 9 जण पायी जात होते. सुरुवातीच्या वेळेस कोणी ओळखीचे नसल्याने राहण्याची व जेवणाची सोय होत नव्हती.
दरम्यान, वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्या गावातील काही मंदिरामध्ये राहण्याची व्यवस्था करावी लागत होती. मात्र 2011 सालापासून स्वामी भक्तांची संख्या वाढत गेली व आज ती 90 वर पोहोचली आहे. 2020मध्ये ‘लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्या कारणाने अक्कलकोट वारी पायी करणे शक्य झाले नाही. मात्र त्यापुढील काळात प्रत्येकवर्षी तरुणांचा वाढत चाललेला प्रतिसाद व श्री स्वामी समर्थ यांच्यावरील भक्तीच्या श्रद्धेमुळे तरुणांची संख्या वाढतच चालली आहे.
याबाबत बोलताना आयोजक लक्ष्मण काळे म्हणाले, “अक्कलकोट पायी वारी घडवणे ही तर स्वामींची इच्छा बाकी आम्ही सर्व निमित्त मात्र आहोत. पायी वारी काढताना सुरुवातीच्या पहिल्या एक-दोन वर्षांत काही अडचणी देखील आल्या, पण अडचणीसोबत प्रत्येक वेळी आशेची नवीन किरणे देखील स्वामींनी पसरवलीत आणि अडचणी आपोआप दूर होत गेल्या. ही वारी दरवर्षी याच पद्धतीने निरंतर चालू ठेवण्याचा उद्देश आहे.