विजय लोखंडे
कोरेगाव भीमा : विठ्ठल नामाची शाळा भरली…! या उक्तीप्रमाणे कोरेगाव भीमा(ता.शिरूर) येथे फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित फ्रेंड्स स्कूलच्या वतीने गावाला वळसा घालून अतिशय आनंदमय वातावरणात पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक काढली. यात सर्व विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्याचा व वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले.
दिंडीत विद्यार्थ्यांच्या हातात मोठा भगवा झेंडा, पालखी व त्यामध्ये पांडुरंग व रुख्मिणी मातेच्या प्रतिमा, त्यानंतर आरास केलेल्या विद्यार्थिनी, भजन व गायन करणाऱ्या मुलींचा संच, अशी सर्व दिंडी आणि वारकरी संप्रदायाची पताका व ज्ञानोबा तुकाराम असा नामघोष करीत वाद्याच्या तालावर पावली खेळत विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या उपस्थित संचालकांच्या हस्ते पालखीचे पूजन पार पडले. विद्यार्थ्यांनी यावेळी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई,संत नामदेव, संत एकनाथ अशा अनेक वेशभूषा केलेल्या होत्या. या सोहळ्यामध्ये नर्सरी विभागापासून इयत्ता दहावीच्या वर्गापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध अभंग, भजन यावर ताल धरत विठ्ठल नामाचा जयघोष केला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष पालखी ढोल, ताशा, लेझिमच्या गजरात शाळेपासून कोरेगाव भीमा ग्रामपंचायत पटांगणात आणली. अशी माहिती फ्रेंड्स एज्युकेशन स्कूलचे शिक्षक प्रा.मारुती दरेकर यांनी दिली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी रिंगण करून विद्यार्थ्याच्या फुगडीचे विविध प्रकार सादर केले. टाळ, मृदंगाच्या तालावर भजन गायन केले. सदर पालखी सोहळ्याची सांगता पसायदानाने केली. पालखी सोहळ्याचे नियोजन उपमुख्याध्यापिका अजिताकुमारी नायर यांच्या मार्गदर्शकनाखाली नर्सरी विभागाच्या प्रमुख निर्मला गव्हाणे, प्राथमिक विभागाच्या प्रमुख वैशाली वाळुंज, वैशाली धर्माधिकारी तसेच माध्यमिक विभागाचे वरिष्ठ शिक्षक मारुती दरेकर, सत्यम हंबीर, शंकर बोरकर, भाविन सैंदाणे, श्रीमंत प्रताळे, प्रियंका फडतरे, शितोळे मॅडम, जाधव मॅडम, अनिता हुंबे इतर सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी केले.
पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले, उपाध्यक्ष प्रकाश खेरमोडे, संचालक शंकर गव्हाणे,संचालक रामदास सव्वाशे, संचालक राजेंद्र गव्हाणे, संचालक सुनील दुगड, संचालक राजेंद्र गव्हाणे, संचालक डॉ.संजय पाटील, संचालक जयकांत देशमुख तसेच कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे यांनी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली धर्माधिकारी यांनी केले व आभार सत्यम हंबीर यांनी मानले.
फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या वतीने २०१६ पासून शाळेत पालखीचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा पालखीचे नववे वर्ष होते. वारकरी संप्रदायाची आवड विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जावी या उद्देशाने पालखीचे आयोजन दरवर्षी केले जाते.
– राजाराम ढेरंगे, अध्यक्ष-फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट तथा संचालक- अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि.
मुलांमध्ये अध्यात्मिक आवड निर्माण होऊन वारकरी संप्रदायाची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, तसेच ज्ञानेश्वर माऊलींचे आणि संतांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे व स्वतःमध्ये परिवर्तन करावे या हेतूने शाळेमध्ये दरवर्षी दिंडी सोहळ्याचे भक्तीमय उत्साहात आयोजन केले जाते. यावेळी संस्थेच्या सर्व संचालकांनी सहभाग घेऊन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो.
– प्रा.मारुती दरेकर सर, वरिष्ठ शिक्षक-फ्रेंड्स स्कूल,कोरेगाव भीमा