– संतोष पवार
पळसदेव (पुणे) : आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव -काळेवाडी नजीक असणाऱ्या तीर्थक्षेत्र विठ्ठलवाडी येथे विठ्ठल भेटीसाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. टाळ मृदुंगाचा गजर, डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, हातामध्ये विणा टाळ, देहभान विसरून विठुनामाचा गजर करणारे भक्तजन, जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामाचा उद्घोष करीत मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी गर्दी केली होती.
प्रतिपंढरी म्हणून गणल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीच्या विठ्ठलरुक्मिणी मंदिराला अत्यंत आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आली होती. आषाढी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भजन प्रवचन कीर्तन नामस्मरणाने विठ्ठलवाडी येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव आणि पंचक्रोशीतील असणाऱ्या काळेवाडी डाळज न्हावी रुई कळस लोणी देवकर तसेच दौंड, बारामती, करमाळा या भागातूनही मोठ्या प्रमाणात विठ्ठलभक्त येथे दाखल झाले होते. पळसदेव ग्रामस्थांच्या वतीने पळसनाथ मंदिर ते विठ्ठलवाडीपर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आसपासच्या छोट्या मोठ्या गावातून अनेक विठ्ठल भक्त पायी चालत दिंड्यामध्ये सहभागी झाले होते. विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी आलेल्या भक्तांमुळे प्रतिपंढरी विठ्ठलवाडीला यात्रेचे स्वरूप आले होते.