नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी अशी ओळख असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. यामध्ये कंपनीने मार्च तिमाहीत 13,762 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मार्च 2024 तिमाहीच्या निकालांसह कंपनीने गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 6 रुपये लाभांश देखील जाहीर केला आहे.
मार्च 2024 च्या तिमाहीत कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 13,191 कोटी रुपयांपेक्षा 4.5% जास्त आहे. याशिवाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन बँकांवर कारवाई करत त्यांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने Yes बँक आणि ICICI बँकेला दंड ठोठावला आहे. Yes बँक आणि ICICI बँक अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे. यामुळे आरबीआयने Yes बँकेला 91 लाख रुपये आणि ICICI बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.
Yes बँकेवर ग्राहक सेवा आणि अंतर्गत आणि कार्यालयीन खात्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, बँकेने अपुऱ्या शिलकीमुळे अनेक खात्यांमधून शुल्क वसूल केल्याची अनेक उदाहरणे आढळल्याचे सांगण्यात आले.