पुणे : पुणे शहरात डबल डेकर बस धावणार असल्याच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. डबलडेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या कालावधीनंतर मुहूर्त मिळाला आहे. पुढील आठवड्यापासून निविदाप्रक्रिया सुरु होणार आहे. 20 डबलडेकरसह 100 ई-बसची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आता ही बस प्रत्यक्ष धावण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन डबलडेकर बस सेवा सुरु करायचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्यात 20 बस घेतल्या जातील. या बस ‘बीआरटी’ मार्गावरून धावणार नाहीत. नव्या बसला दोन जिने असणार आहे. इलेक्ट्रिक व वातानुकूलित सेवा.
शहरात डबल डेकर बस धावणार असल्याने पुणेकरांचा प्रवास आरामदायक होणार आहे. डिजिटल तिकिटाची बसमध्येच सुविधा असेल विशेष म्हणजे या बसचा ‘लुक’ लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा राहणार आहे. 70 प्रवाशांची क्षमता असलेल्या या बसमध्ये एकाच वेळी किमान शंभरपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकणार आहे .
डिसेंबर 2022 मध्ये बसखरेदीचा निर्णय झाला होता. त्यास संचालक मंडळाने मंजुरीही दिली होती. मात्र त्यानंतर सारे ठप्प झाले. मात्र आता या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
इलेक्ट्रिक बस एक किमी धावण्यासाठी अवघे सहा रुपये खर्च येतो. मात्र ठेकेदाराच्या बसला प्रतिकिमीसाठी 50 ते 60 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वत: मालकीच्या बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमपी बॅंकाकडून कर्ज घेणार आहे. याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्याकडूनही आर्थिक साहाय्यही घेण्यात येणार आहे.
पीएमपी स्वत:च्या मालकीच्या 100 इ-बस घेईल. यात 20 डबलडेकर बस असतील. पुढील आठवड्यापासून निविदा प्रक्रियेला सुरवात होईल. या प्रक्रियेसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
– नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमरीएमएल, पुणे