दौंड : दौंड तालुक्यातील साखर कारखान्यांनी आडसाली ऊस लागवड नोंदी 1 जुलै पासून केल्या आहेत. कारखान्याच्या गटनिहाय कार्यालयाला शेतकऱ्यांनी उसाची नोंद केली आहे. ऊस हे पीक एकरकमी व भरघोस उत्पादन देणारे पीक असल्यामुळे अधिक शेतकरी वर्ग हा ऊस लागवडिकडे वळला आहे. परंतु देलवडी, पिंपळगाव,राहु, उंडवडी, पारगाव, नागगाव, कानगाव, या गावांत गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या परिसरात ओला दुष्काळ पडला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी ऊस पीक धोक्यात येऊ लागले आहे.
या भागातील जमिनी चोपणाट झाल्याने शेतकरीवर्ग हा या भागात ऊस लागवड करतात. परंतु या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने या चोपण भागातील शेतकरी वर्गाला ऊस लागवड केलेली ऊस लागण ही पाण्यात गेल्याने पुन्हा ऊस लागवड करावी लागणार आहे. कारण ऊस बेणे पाण्यात सडल्याने ऊस उगवण झाली नाही. तर उटी संवर्धन करून वापरलेली उसाची रोपे देखील पिवळी पडली आहत. त्यामुळे शेतकरी वर्गाला नांगरट, सरी काढणे, सरी,सरी ओढणे ,बेणे अथवा पुनः रोपे लागवड करावी लागणार आहे. त्यासाठी प्रती एकरी 30 ते चाळीस हजार रुपये पुन्हा खर्च करावा लागणार आहे.
हमखास दर मिळवून देणारा आणि उत्पादनाची खात्री असलेले पीक असल्यामुळे ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत चालला आहे. परंतु उसाचे पीक म्हणजे महासंकटच ठरल्यात जमा आहे. कारण, उन्हाळ्यात ऊस वाळून जाऊ लागतो, तालुक्यांतील कारखाने लवकर ऊसतोड करत नाहीत, तर बाहेरील कारखान्यांना ऊस घालण्यात आला तर वेळेवर शेतकऱ्यांना बिल मिळत नाही. त्यातच सततच्या पावसामुळे लावलेली उसाची रोपे व बेणे पाण्यामुळे सडून जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे.
बाळासाहेब वाघोले – ऊस उत्पादक शेतकरी (देलवडी)