बारामती : मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये ऐरणीवर असल्याने सरकारने यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीवर विरोधी गटातील तिन्ही पक्षांनी बहिष्कार घातल्यामुळे सत्ताधारी संतापले, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले छगन भुजबळ?
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन सुरु असलेलं भांडण मिटावे म्हणून सह्याद्री अतिथीगृह येथे एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं की, तुम्ही पण या. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बोललो होतो. शरद पवार यांना सुद्धा बोलवा. एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार तिथे यायला पाहिजे होते, असं छगन भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू : छगन भुजबळ
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीला सगळे येणार होते. मात्र, संध्याकाळी बारामतीमधून एक फोन गेला आणि त्या सगळ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. तुमचा राग अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावर असेल पण हे मिटवण्यासाठी तुम्ही का येत नाही? महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत. पण अशा मुद्द्यांवर बहिष्कार टाकून समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे बरोबर नाही.
शरद पवारांचा माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावरील राग समजू शकतो. बारामतीमधून सर्वपक्षीय बैठकीला जावू नये म्हणून ५ वाजता फोन करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.
विधानपरिषदेला कोणाची मते फुटली हे बघितले
पुढे म्हणाले, पावसाळी अधिवेशन संपले आहे. यावेळी अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिल, विद्यार्थी योजना, शेतकरी सन्मान योजना या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. ही सर्व कामे जनतेपर्यत पोहोचण्यासाठी हा जनशक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानपरिषद निवड झाली त्यात सांगितले की, आमची मते फुटतील पण कुणाची मते फुटली हे तुम्ही बघितले, असे छगन भुजबळ म्हणाले.