सासवड : मागील काही दिवसांपासून सासवड नारायणपूर रस्त्यावर 5 ते 6 जण बुलेटवर फिरून फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज काढत होते. या आवाजाला वैतागून गावकऱ्यांनी सर्वानुमते बुलेट चालकांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. आणि त्याअनुषंगाने नागरिकांनी एक बुलेट पकडून तिचा दगडाने ठेचून चेंदामेंदा केला आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून काही मुले नारायणपूर येथे गुरुवारी (ता.11) रात्री आले होते. या मुलांकडे 5 ते 6 बुलेट व इतर काही दुचाकी होत्या. सासवड येथुन नारायणपूरच्या दिशेने जाताना मुलांनी बुलेट मधून फटाक्यासारखे मोठे आवाज काढले. इतरांना त्रास होईल असे वर्तन करत मुले चालले होते. परंतु हा बेशिस्तपणा पुरंदर तालुक्यातील एका गावाला रुचला नाही. आणि ग्रामस्थांनी एक बुलेट अडवली. आणि दगडाने ठेचून बुलेटचा चेंदामेंदा केला. तसेच बुलेट चालकाला प्रसाद देऊन पोलिसांच्या हवाली केले.
दरम्यान, सध्या बुलेटची तरुणाईत मोठी क्रेझ आहे. बुलेट म्हटले की, नजरेसमोर येतो तो फर्रर्रर्र फटाक् असा आवाज अन् दचकलेले, घाबरलेले चिमुकल्यांसह वृद्धांचे चेहरे.
या मोटारसायकलींच्या सायलेंसरमध्ये अनेक तरूण बदल करत आहेत. त्यातून कर्कश व धडकी भरणारा आवाज निर्माण केला जातो. महामार्गावर, शाळेच्या परिसरात सर्वात पुढे वेगात जाऊन फटाका वाजवणे, गल्ली बोळातून भरधाव वेगात जाताना मध्येच फटाका वाजवणे. यामुळे अनेक दुचाकीस्वार गडबडतात. तर ही वाहने मोठ्या घरातील व्यक्तींची असल्याने यावर पोलीस, आरटीओ विभाग दुर्लक्ष करत असल्याच्या अनेक तक्रार आहे.
नागरिकांच्या निर्णयाचे स्वागत
बुलेट मधून फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या चालकांना नागरिकांनी चांगली अद्दल घडवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे आतातरी या भागात बुलेटचा आवाज बंद झाला आहे. तसेच पोलीस प्रशासनाने या गाड्यांवर कडक कारवाई केली तर सासवड तालुक्यात बुलेटचा आवाज कायमचाच बंद होईल. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
बुलेट दगडाने ठेचतानाचा व्हिडिओ व्हायरल
बुलेट मधून फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या तरुणांना नागरिकांनी चांगलाच धडा शिकविला आहे. तसेच नागरिकांनी बुलेट दगडाने ठेचतानाचा व्हिडिओ काढला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे बुलेट चालकांना आतातरी चाप बसणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.