उरुळी कांचन, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील फळीवस्ती येथील ओढ्यालगत सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट 6 कडील गुन्हे प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता.12) हि कारवाई केली आहे.
रामभोला मकाशी नानावत (वय-20, रा. फळीवस्ती, अष्टापूर, ता हवेली, जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे व सचिन पवार यांना एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार फळीवस्ती येथील ओढ्यालगत छापा टाकला असता रामभोला नानावत हा भट्टी लावून दारू काढत असल्याचे दिसून आले.
त्याच्या ताब्यातून 2 हजार लीटर कच्चे रसायन (त्यात गुळ, नवसागर, तुरटी मिश्रित), 1 मोठा लोखंडी बॅरल, 35 लीटर तयार दारू असा एकूण 50 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
दरम्यान, याप्रकरणी नानावत याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ब)(क)(फ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम व त्यांचे पथकाने लोणीकंद पोलीस स्टाफ यांचे मदतीने केली आहे.