कोपरगाव : पत्नीने पतीसोबत येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या व स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे गुरुवारी (दि. ११) रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. संगीता सुभाष सोनवणे (रा. सोयेगाव ता. नांदगाव जि. नाशिक) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी जखमी महिलेचे मामा अण्णा वामन बर्डे (वय-५५, रा. चासनळी, ता. कोपरगाव) यांनी शुक्रवारी (दि. १२) रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी सुभाष हिरामण सोनवणे (रा. सोयेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अण्णा बर्डे यांचा मुलगा रामा बर्डे यांचे मंगळवारी (दि. ९) लग्र होते. त्या लग्रासाठी भाची संगीता सोनवणे सोमवारी (दि. ८) चासनळी येथे आली होती. लग्राच्या दिवशी तिचा पती सुभाष सोनवणे हा देखील लग्नाला आला होता. लग्न झाल्यानंतर दोघे पती-पत्नी बर्डे यांच्या घरी आले आणि पुढील दोन दिवस मुक्कामी राहिले. गुरुवारी (दि. ११) सकाळी सुभाष हा त्याच्या गावी निघून गेला होता.
त्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास परत चासनळी येथे आला. त्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पती पत्नीमध्ये घरी जाण्यावरून वाद सुरू होता. सुभाष हा संगीताला शिवीगाळ व दमदाटी करत होता. पती-पत्नीचे भांडण असल्याने बर्डे यांनी जास्त काही लक्ष दिले नाही. त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास अचानक संगीताचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. त्या वेळी बर्डे घराबाहेर आले असता संगीता बेशुद्ध होऊन रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली.त्यानंतर आरोपी सुभाष याने त्याच्या हातातील चाकू स्वतःच्या गळ्यावर मारून घेतला.
दरम्यान, जखमी संगीताला तातडीने चासनळी येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गळ्याला दहा ते अकरा टाके पडले आहेत. तसेच हल्लेखोर पती सुभाष याच्या गळ्यालाही जखम झालेली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन पुढील तपास करत आहेत.