नाशिक : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. देशात नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला आहे. पहिल्या दोन टर्ममध्ये देशात पायाभूत सोयी-सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असल्याचे बोलले जात आहे. यात रस्ते, ब्रिज उभारणी तसेच हवाई आणि रेल्वे मार्ग विस्तार याचा समावेश होता. मात्र महाराष्ट्रात रेल्वेचे काही प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत. यात एक नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प आहे.
आता नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी पालकमंत्री दादा भुसे मैदानात उतरले असल्याचे चित्र आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून या रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा मुद्दा उचलून धरला त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने हालचाल सुरु केली आहे. राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे दादा भुसे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात स्पर्धा आहेत. त्यातूनच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. नाशिक आणि पुणे ही दोन्ही महाराष्ट्रातील समृद्ध, प्रगत शहर आहेत. पण अजूनही रेल्वे मार्गान ही शहर जोडली गेलेली नाहीत.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे किती किलोमीटरचा असेल?
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पात 235 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. नाशिक-पुणे दरम्यान 20 रेल्वे स्टेशन असतील. नाशिक-पुणे रस्त्याने जाण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. मात्र या हायस्पीड रेल्वेमुळे हाच प्रवास फक्त 1 तास 45 मिनिट वर येणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे.
अद्याप प्रकल्पाला मंजुरी नाही. त्यामुळे प्रकल्पाला गती मिळत नाही आहे. या आधी देखील स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मुंबईत बैठक घेतली होती. पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्रानंतर पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.