पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात कोथिंबिरीची प्रचंड आवक झाल्याने बाजारभाव घसरले. त्यामुळे खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी तीस-चाळीस रुपये गड्डी आज तीन ते पाच रुपये झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कोथिंबीर टाकण्यासाठी लागणारे हायब्रीड जातीचे धना बियाणे साडेतीनशे ते चारशे रुपये किलो दराने खरेदी करावी लागते.
एकरी वीस ते पंचवीस किलो बियाणे लागते. बियाण्याच्या जातीनुसार पेरणीपासून काढणीस तयार होईपर्यंत तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी लागतो. शेताची मशागत, बी-बियाणे, औषधे, खतांचा खर्च काढला; तर शेतकऱ्याचे कष्ट वाया जात आहे. नफा मिळण्याऐवजी तोटाच सहन करावा लागतो आहे. कष्टाने पिकवलेला माल डोळ्यांदेखत दोन, तीन, पाच रुपये दराने विकून तोटा सहन करून घरी परतावे लागत आहे.