लोणी काळभोर : इमारतीच्या पाचव्या मजल्याचे स्लॅप भरताना बांधकामाचे साहित्य वाहण्याची लोखंडी ट्रॉली कामगाराच्या डोक्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी मालधक्का जवळ असलेल्या चिंतामणी पार्क मध्ये ५ जूनला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास रघुनाथ सवारिय (वय ३३, सध्या रा. लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे मुळ रा. जामखाड ता. गिरणा जि. भरगुन राज्य मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर बांधकाम व्यावसायिक महेश अंकुश खराडे (रा. साखरवाडी, ता. फलटण जि. सातारा), स्वप्निल अर्जुन भांड (रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे) व ठेकेदार मल्लेश तेजप्पा पाटील (रा. लोणीकाळमोर ता. हवेली जि. पुणे ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तेजस विलासराव जगदाळे (वय ३०, पोलीस नाईक, लोणीकाळभोर पोलीस ठाणे) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास सवारिय हा परप्रांतीय असून तो लोणी काळभोर परिसरात बांधकाम मजूर म्हणून लागेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. तर आरोपी महेश खराडे व स्वप्निल भांड यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी मालधक्का जवळ असलेल्या चिंतामणी पार्क मध्ये इमारतीच्या बांधकामाचे काम घेतले होते. तर हे काम ठेकेदार मल्लेश तेजप्पा पाटील यांना दिले होते. ठेकेदार मल्लेश पाटील यांच्याकडे कैलास सवारिय बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता.
दरम्यान, ५ जूनला इमारतीच्या पाचव्या मजल्याचे स्लॅप भरण्याचे काम सुरु होते. तर कैलास सवारिय हा रस्त्यावरील खडी गोळा करीत होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काम करीत असताना, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून सिमेंट, वाळु मिक्स केलेलं मटेरिअर वाहण्याची लोखंडी ट्रॉली कैलास सवारिय यांच्या डोक्यात अचानक पडली. यावेळी कैलास सवारिय हा गंभीर जखमी होऊन बेशुध्द अवस्थेत खाली पडला होता. त्याला लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे तातडीने रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी जखमी कैलासची चौकशी केली असता, तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर कैलास सवारिय याची तब्बेत बिघडत गेल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कैलास सवारिय यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, बांधकाम व्यावसायिक महेश खराडे, स्वप्निल अर्जुन मांह व ठेकेदार मल्लेश तेजप्पा पाटील यांनी बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना केली नसल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.