इंदापूर : शिवधर्म फाऊंडेशन व दूध उत्पादक शेतकरी, इंदापूर यांच्या वतीने मंगळवारी (दि.१६) इंदापूर नगरपालिके समोर दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष दीपक काटे यांनी दिली. या दूध परिषदेत समन्वयक दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, दूध व्यवसायिक संघटना, सदस्य दुग्ध विकास सल्लागार समितीचे प्रकाश कुतवळ हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेच्या माध्यमातून गाईच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा, मागील फेबुवारी, मार्च 2 महिने व इथून पुढील काळात मिळणाऱ्या दुध अनुदानाचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना 100% मिळावा, सरकारने दूध पावडर व दुग्धजन्य पदार्थावरील GST कमी करावी, पावडर निर्यातीला अनुदान देऊन पावडर एक्स्पोर्ट करावी, दहा हजार टन पावडर आयात त्वरित थांबवावी, भेसळ थांबण्यासाठी कायदे करुन त्याची अंमलबजावणी करावी, 3.2, 8.3 SNF बसे रेट करावा. (ज्याला केंद्र सरकारची परवानगी आहे), पशुधनाचा एक रुपयात विमा करावा, दूध उत्पादकांना कायमस्वरूपी रास्त बाजार भाव मिळावा यासाठी सरकारने योग्य ती उपाययोजना करावी, जो कोणी सरकारच्या आदेशाची खाजगी व सहकारी संघ अंमलबजावणी करणार नाही त्या खाजगी व सहकारी संघाचे परवाना त्वरित रद्द करण्यात यावा.
महाराष्ट्र सरकारने दररोज वीस लाख लिटर दूध खरेदी करून त्याचे पावडर बनवून शालेय पोषण आहार व गर्भवती महिलांना पोषण आहारात सामावेश करावा व महानंदाने स्वतःचा ब्रेड तयार करून त्याचे मार्केटिंग करावे या दूध उत्पादकांच्या मागण्या या सरकारला करण्यात येणार आहेत. तरी या दूध परिषदेस राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक काटे यांनी केले आहे.