मुंबई : मुंबईच्या डोंबिवलीमधील एका नवविवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणीने आत्महत्येआधी मोबाईलमध्ये लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे मानपाडा पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पोलीस हावलदार पती आणि त्याच्या आईला अटक केली आहे. जागृती बारी असं आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
जागृती ही मूळच्या भुसावळमधील कुऱ्हे पाना गावचे गजानन भिका वराडे यांची कन्या होत्या. एप्रिल महिन्यामध्येच तिचं जळगावमधील पिंप्राळामधील सागर बारी नावाच्या ३२ वर्षीय तरुणाशी लग्न झालं होत. त्यांच्या लग्नासाठी वडिलांनी ७ लाखांचा खर्च केला होता. मात्र, लग्नामध्ये सोनं-नाण्याच्या भेटवस्तू दिल्यानंतरही जागृतीच्या सासरकडून हुंड्याची मागणी करण्यात आली. तसेच मुंबईमध्ये घर घेण्यासाठी १० लाख रुपये देखील बारी कुटुंबाने केली. मात्र मुलीच्या वडिलांनी जमेल तसे पैसे देऊ असं जागृतीच्या कुटुंबाला सांगितलं.
लग्नानंतर दोन महिन्यांनी जागृती डोंबिवलीतील मानपाडा येथील सागरच्या घरी राहण्यास आली. मात्र, सागर आणि त्याच्या आईकडून तिचा हुंड्यासाठी सतत तगादा लावला. जागृतीला तिचा पती आणि सासू, ‘तुझे ओठ काळे आहेत’, ‘तुझ्या तोंडाचा घाण वास येतो’ असं वारंवार बोलून हिणवायचे. या सततच्या त्रासाला कंटाळून जागृतीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून जागृतीचा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांना अटक केली आहे.