छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले आहे, तर कारमधील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सतिश शाहू मगरे (वय-32) व पत्नी तेजल सतिश मगरे (वय-28, दोघेही रा. पाथरवाला, ता. अंबड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्यांची नावे आहेत.
ही घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड जवळ लेंभेवाडी फाट्यानजीक रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कारचालक व अन्य एक जण जखमी अवस्थेत घटनास्थळाहून फरार झाले. मृत हे छत्रपती संभाजीनगर येथे सहा महिन्यापासून वकिली करीत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, सतिश मगरे आणि पत्नी तेजल मगरे हे छत्रपती संभाजीनगर येथे सहा महिन्यापासून वकिली करीत होते. सतिश मगरे आणि पत्नी तेजल सतिश मगरे हे दोघे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अंकुशनगर येथे आले होते.
साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून ते छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकीने जात होते. त्यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी शिवारात छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये सतिश मगरे व तेजल मगरे हे दोघे पती पत्नी जागीच ठार झाले.
दरम्यान, कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूने जाऊन दुचाकीला धडकून शंभर फूट फरफटत नेली. यात मगरे दांपत्य कारखाली दबले गेले. कारमधील चालकासह अन्य एकजण जखमी अवस्थेत कारमधून बाहेर पडून पसार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व अंबडचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने कारखाली दबलेल्या दांपत्याला बाहेर काढले. त्यानंतर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण करीत आहे.