उरुळी कांचन : साहेबांनी मनात आणले तर एखाद्या संस्थेचा, एखाद्या गावाचा कायापालट कसा होऊ शकतो, याचे उदाहरण पुन्हा एकदा उरुळी कांचनच्या ग्रामस्थांनी अनुभवले. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी एकाच बैठकीत व एका फोनवर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे शरद पवार अध्यक्ष असल्याने, शनिवारी (ता. 6) संस्थेच्या बैठकीसाठी आलेल्या पवार साहेबांनी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची किमया साधली आहे. दरम्यान, पवारसाहेबांनी उपलब्ध करुन दिलेला निधी महिनाभरात संस्थेला मिळणार असून, येत्या 15 ऑगस्टला महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त सचिव सोपान कांचन यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ला दिली आहे. या बैठकीला महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजाराम कांचन, देविदास बन्साळी, संभाजी कांचन, महादेव कांचन, राजेंद्र टिळेकर, मनोहर कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोपान कांचन म्हणाले की, उरुळी कांचन येथील शैक्षणिक संकुलात 8 हजार हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यालयाने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. तर काही विद्यार्थी देश पातळीवरही आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत. ज्या वर्गात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे प्रवित्र कार्य करण्यात आले आहे. त्या विद्यालयाची इमारत ही 70 वर्षापूर्वीची असून, ती आता पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विद्यालयासाठी नवीन इमारत बांधावी लागणार आहे. त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सोपान कांचनसह विश्वस्थांनी शरद पवार यांच्याकडे केली.
दरम्यान, या मागणीची शरद पवार यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील एका उद्योग समूहाकडे संपर्क केला. तेव्हा त्या उद्योग समूहाने सीएसआर फंडातून 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. तसेच पवार साहेबांनी महात्मा गांधी सर्वोदय संघामध्ये जमा असलेला 5 कोटी रुपयांचा निधी विद्यालयाची इमारत बांधण्यासाठी मंजूर केला आहे. तसेच इमारत बांधण्यासाठी अजून अडीच कोटींचा निधी कमी पडत आहे. त्यासाठी आम्ही बँकांचे कर्जही घेणार आहे, असे सोपान कांचन यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांचे उरुळी कांचन गावावर विशेष प्रेम
महादेव कांचन म्हणाले, देशाचे नेते आदरणीय शरद पवार यांचे उरुळी कांचन गावावर विशेष प्रेम आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थी हा याच संकुलात शिकला पाहिजे. हे धोरण स्वीकारून त्यांनी आतापर्यंत 20 कोटीहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध करून महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालय, बी. जे. शिर्के प्राथमिक विद्यालय व किमान कौशल्य विभाग (किको) या शाळा विद्यार्थ्यांसाठी अल्प व नि:शुल्क दरात सुरु केल्या आहेत. या शैक्षणिक संकुलाचा उरुळीकांचन सह पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार व गरीब नागरिकांना झाला आहे.
रोपट्याचं झालं वटवृक्ष
विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे. ही संकल्पना मनाशी गाठ बांधून डॉ. मणिभाई देसाई, दत्ता कांचन व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1950 सालच्या आसपास महात्मा गांधी सर्वोदय संघाची स्थापना केली. तेव्हा महात्मा गांधी विद्यालयातून पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता या रोपट्याचे वटवृक्ष तयार झाले असून, या शाळांमधील शैक्षणिक सुविधा व गुणवत्तेमुळे नावलौकिकास आले आहे, असेही महादेव कांचन यांनी सांगितले.
शैक्षणिक सुविधांबरोबर प्रयोगशाळा व स्वतंत्र वाचनालय मिळणार
संभाजी कांचन म्हणाले की, ‘शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यामातून महात्मा गांधी विद्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. ही इमारत बांधल्यावर विद्यार्थ्यांना भौतिक, शैक्षणिक सुविधांबरोबर प्रयोगशाळा व स्वतंत्र वाचनालय मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थांना याचा नक्कीच गुणवत्ता वाढीसाठी फायदा होणार आहे. या इमारतीचे भूमिपूजनही शरद पवार यांच्या हस्ते 15 ऑगस्टला करण्यात येणार आहे. तसेच शरद पवार यांच्या छायाछत्रेखाली काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो’.