उरुळी कांचन, (पुणे) : नव्याने प्रस्थापित झालेल्या उरुळी कांचन ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनेत कमालीची वाढ होत असून गेल्या काही महिन्यात दरोडा, घरफोड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चोरटयांनी हातोहात लंपास केलेले दागिने, रोख रक्कम, दुचाकी चोरी व आदी घडलेल्या घटनांपैकी एकाही चोरीचा तपास लावण्यात उरुळी कांचन पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत.
सोरतापवाडी, शिंदवणे, उरुळी कांचन या ठिकाणी वारंवार चोरीच्या घटना घडत आहे. तसेच सीसीटीव्हीत चोर, दरोडेखोर दिसून येत आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना पकडण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही.
चोरी झालेले व्यक्ती फिर्याद पोलीस ठाण्यात देतात. त्यांची नोंद पोलीस ठाण्यात घेतली जाते, प्रत्यक्षात या घटनांचा तपास नेमका कसा केला जातो, त्यात पोलिस काय करतात याची फिर्यादीला कधीच माहिती दिली जात नाही. आपल्या चोरीच्या तपासाबाबत चौकशी केल्यानंतर केवळ तपास सुरु आहे इतके मोघम उत्तर फिर्यादाला ऐकावे लागते.
केवळ घरफोडीच्या किंवा दागिन्यांच्या चोरीचाच विषय नसून मोटारसायकल, महावितरणच्या रोहित्रामधील तांब्याची तार, जीवनावश्यक वस्तूंची चोरी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरीच्याही दैनंदिन घटना उरुळी कांचन व परिसरात घडत आहेत. त्याचाही तपास करण्याची नागरिकांची मागणी आहे. उरुळी कांचन पोलिसांची दिवसा गस्त गरजेची असताना तशी गस्त होत नाही, संशयास्पद वाहनांची अचानक तपासणी केली जात नाही, खबऱ्यांचे मजबूत जाळे आवश्यक आहे पण अनेकदा पोलिसांना बंदोबस्त व इतर कामातून सवडच होत नसल्याचे सांगितले जाते.
शहरात चोरट्यांचा धुमाकूळ गेली दीड दोन महिने सुरू आहे. दुचाकी गाड्यां चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तर थेट बंद कार्यालय, दवाखाने व सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
चोरीची पुन्हा घटना…..
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कडवस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे 1 लाख 3 हजार रुपयांची रोख रक्कम व अंदाजे 2 ते 3 तोळे वजनाचे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. 7) पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. विजयकुमार भांडवलकर (पत्ता माहिती नाही) अशी चोरी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. अशी खात्रीदायक माहिती मिळली आहे.
चोरटा सीसीटीव्हीत कैद..
कडवस्ती या ठिकाणी चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोरट्यांनी काळी जॅकेट परिधान केली होती. तोंडाला सफेद रुमाल लावले होते. साडेपाच फुट उंच, वय 30 ते 35 होते. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यावेळी सीसीटीव्ही मध्ये चोराची छबी कैद झाली असून, या व्यक्तीने चेहऱ्यावर पूर्ण मास्क लावल्यामुळे व्यक्ती ओळखू येत नाही. सीसीटीव्हीमध्ये घरफोडी करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीची छबी कैद झाली असून त्याने चेह-यावर मास्क लावल्यामुळे व्यक्ती ओळखू येत नाही.