पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दोन माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावेळी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा या दोन्ही माजी आमदारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांची लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीलाही आघाडी कायम राहणार असे, आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. पुणे शहरात विधानसभेच्या ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामधील दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे, पाच ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी ३ तर ठाकरे गटाच्या वाट्याला प्रत्येकी २ जागा येतील अशी चर्चा सुरु आहे. कोथरूडची जागा ठाकरे गटाला जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर हडपसर येथे शरद पवार गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोकाटे, बाबर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत मोकाटे म्हणाले कि, बारामती लोकसभा मतदारसंघात चांगलं काम केल्याने पवार साहेबांनी आम्हाला भेटायला बोलावलं होतं. तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद आहे. त्या मतदार संघातून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मोकाटे म्हणाले.
महादेव बाबर म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीला पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केले आहे, त्यामुळे आज शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे. आमची विधानसभेची तयारी कायम सुरु असून निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. तसेच जागा वाटपात हडपसरची जागा कोणाकडे असणार हे निश्चित झालेलं नाही. मात्र ही जागा आमच्याकडे असावी, असे आम्हाला वाटते. अन्य कोणी निवडणुकीसाठी इच्छुक असले तर ते चुकीचे नाही. जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, त्याला आम्ही निवडून आणू, असे महादेव बाबर म्हणाले.