आळंदी: तरुणीचे बनावट आधारकार्ड तयार करुन तिचे दोन तरुणांसोबत लग्न लावून देत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीसह पाच जणांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील आळंदी येथील पोपळे मंगल कार्यालय आणि वाघोली येथे गुरुवारी 4 जुलै रोजी घडला आहे.
राहुल दशरत कनसे (वय- 37 रा. त्रिवेणी नगर, तळवडे, मूळ रा. भांडवली, ता. माण, जि. सातारा) यांनी या प्रकरणी शुक्रवार 5 जुलै रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ज्योती रविंद्र पाटील उर्फ ज्योती धनंजय लोंढे, भावेश रवींद्र पाटील, ज्योती पाटीलचे आई-वडील आणि त्यांची मुलगी निशा दत्ताराम लोखंडे (रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(2), 319(2), 318 (4), 336(3), 340(2), 3(5) नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन मुलगी निशा लोखंडेच्या विवाह चैतन्य खांडे यांच्यासोबत लावून देत चैतन्य यांच्याकडून पैसे घेतले होते. तसेच निशाचे बनावट आधारकार्ड तयार करत त्याच्या आधारे फिर्यादी राहुल कनसे यांना तिचे नाव निशा दत्तराम पाटील असे असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी राहुल यांचा भाऊ सुनील कनसे यांच्यासोबत निशाचे लग्न लावून दिले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून एक लाख 55 हजार रुपये रोख, तर 95 हजार भावेश रवींद्र पाटील याच्या खात्यावर स्वीकारण्यात आले. यामध्ये आरोपींनी संगनमत करुन तोतयेगिरी करत दोन लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.