पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली विठुमाउली नव्याने तयार करण्यात आलेल्या चांदीच्या मेघडंबरीत विसावली आहे. आता मेघडंबरीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्त्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभाऱ्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे.
यामध्ये श्री विठ्ठल गाभाऱ्यातील लाकडी मेघडंबरी चांदीने मडवून बसविण्यात आली असून रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्याचे काम सुरू आहे. या मेघडंबरीस नांदेड येथील भाविक सुमीत गणपतराव मोरगे यांनी २ कोटी ४५ लाखाची चांदी अर्पण केली असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. गुरुवारी रात्री मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मेघडंबरीचे पूजन करून श्री विठ्ठल गाभाऱ्यात बसविण्यात आली आहे.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिदि, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सल्लागार परिषद सदस्य अनिल अत्रे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी, ज्ञानेश्वर कुलकर्णी, देणगीदार सुमीत मोरगे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कबीरदास महाराज फड यांच्याकडून मेघडंबरी अर्पण
श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून मंदिर समितीस दोन लाकडी मेघडंबरी अर्पण करण्यात आल्या आहेत. या दोन्ही मेघडंबरीस सुमारे २ कोटी ४५ लाखांची चांदी नदिड येथील दानशूर भाविक सुमीत मोरगे यांनी बसवून दिली आहे. त्यासाठी श्री विठ्ठल गाभाऱ्यातील मेघडंबरीला सुमारे १३५ किलो व श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीला सुमारे ९० किलो चांदीचा वापर करण्यात आला असून मेघडंबरीला चांदीपासून सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे.
सदर चांदीचा पत्रा १६ ते २६ गेजचा असून, हे काम पुणे येथील जांगिड सिल्वर वर्क्स यांनी केले आहे. १३ कारागिरांनी २५ दिवसांत हे काम पूर्ण केले आहे. लाकडी मेघडंबरी अमोल सुतार, बाळू सुतार, पांडुरंग लोंढे या कारागिरांनी तयार केला असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.