पिंपरी : गुगलवर रेस्टोरंटला रेटिंग देऊन पैसे कमावण्याबाबत विश्वास संपादन करून एका व्यक्तीची ७ लाख ४० हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सांगवीत घडल्याचे समोर आले. या प्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस सोशल मीडियावरून संपर्क केला. फिर्यादीस गुगलवर रेस्टोरंटला रेटिंग देण्याचे काम असून एका रेटिंगसाठी २५ रुपये मिळतील असे आमिष दाखवले. फिर्यादींनी ते काम सुरु केले. सुरुवातीला आरोपींनी फिर्यादीस आठ हजार ६९५ रुपये दिले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करत यांना प्रीपेड टास्क देऊन त्यांच्याकडून ७ लाख ४० हजार ४०५ रुपये घेतले. त्यानंतर त्यांना परतावा अथवा त्यांची गुंतवणुकीची रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.