पुणे : शहरातील नागरिकांच्या प्रश्नांचे निवारण करण्याकरिता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, आता प्रत्येक पोलीस ठाण्यात जनता दरबार भरविण्यात येणार आहे. येत्या शनिवारी त्याची सुरुवात होणार असून, प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता ‘तक्रार निवारण दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजण्याच्यादरम्यान हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याकरिता संबंधित परीमंडळाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त हे पोलीस ठाण्यामध्ये हजर राहणार आहेत.
शहरात चोऱ्या, हाणामाऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न, वाटमाऱ्या, घरफोड्या, दरोडे, बेदम मारहाण, अपघात आदी स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. यातील अनेक तक्रारी पोलीस चौकी त्यानंतर पोलीस ठाणे स्तरावर सोडविल्या जातात. अनेकदा पोलिसांच्या कारवाईवर नागरिक समाधानी नसतात. त्यामुळे त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रार द्यावी लागते. गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणांमधील तक्रारदार देखील तपासाविषयी अनभिज्ञ असतात. त्यांना तपासातील प्रगती समजत नसते. अनेकदा नागरिक त्यांची तक्रार देण्यास कचरतात. पोलिसांकडून देखील त्यांना नीट वागणूक दिली जात नसल्याच्या तक्रारी येत असतात. नागरिकांचे समाधान व्हावे, त्यांच्या समस्यांचे आणि तक्रारींचे निराकरण केले जावे तसेच त्यांना शहरात सुरक्षित वाटावे याकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अतिरिक्त पोलीस आयुक्त, परीमंडळीय उपायुक्त, विभागीय सहाय्यक आयुक्त आणि पोलीस ठाणे स्तरावरील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दर शनिवारी त्यांच्या हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींच्या निराकरणासाठी हा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्याची सुरुवात येत्या शनिवारी ६ जुलै रोजी होणार आहे. त्यानुसार, परीमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल हे खडक पोलीस ठाण्यात, परीमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात, परीमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम सिंहगड रोड पोलीस ठाण्यात, परीमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर येरवडा पोलीस ठाण्यात, परीमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा कोंढवा पोलीस ठाण्यात उपस्थित राहणार आहेत.
तर, विश्रामबाग विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्रामबाग, फरासखाना विभागाचे सहाय्यक आयुक्त समर्थ पोलीस ठाण्यात, लष्कर विभागाचे सहाय्यक आयुक्त बंडगार्डन, कोथरूड विभागाचे सहाय्यक आयुक्त वारजे माळवाडी, स्वारगेट विभागाचे सहाय्यक आयुक्त सहकारनगर, सिंहगडरोड विभागाचे सहाय्यक आयुक्त पर्वती, येरवडा विभागाचे सहाय्यक आयुक्त लोणीकंद, खडकी विभागाचे सहाय्यक आयुक्त चतु:शृंगी, हडपसर विभागाचे सहाय्यक आयुक्त हडपसर पोलीस ठाणे, वानवडी विभागाचे सहाय्यक आयुक्त वानवडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहणार आहेत.