वाघोली : येथील पोस्टमन नामदेव गवळी यांनी लोकवर्गणी आणि मित्रांच्या सहकार्याने फोपसंडी या दुर्गम गावातील शंभर विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतकं शालेय साहित्य पुरवले. पोस्टमन गवळी हे वाघोली गावात पोस्टमन म्हणून काम करतात. सोबतच त्यांना समाजकार्याची प्रचंड आवड आहे. गेली पाच वर्ष ते स्वखर्चाने व लोकवर्गणीतून दरवर्षी सातशे ते आठशे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य पुरवतात.
त्यांचे शिक्षण हलाखीच्या परिस्थितीत झाले असल्याने गोरगरिबांना शैक्षणिक अडचण येऊ नये या उदात्त हेतूने ते हा विधायक उपक्रम अविरत चालवत आहेत. सोबतच त्यांना गडकोट भ्रमंतीची अफाट आवड आहे. या आवडीतून फोपसंडी येथे कुंजरगडाच्या सफरीवर गेले असता त्यांच्या गावचे भूषण दत्तात्रय मुठे यांच्याशी भेट झाली. भेटीतून शाळेच्या निवडीविषयी समजले. त्यातूनच पोस्टमन गवळींनी सहकारी अक्षय ढोरे, चैतन्य पवार यांच्या सहकार्याने साहित्य गोळा करुन भर पावसात फोपसंडी गाठली. शाळेतील सर्वच मुलांना वस्तूंचे वाटप केले गेले. यावेळी एवढे भरीव साहित्य मिळाल्याने मुलांसमवेत पालकही आनंदून गेले.
शाळेचे मुख्याध्यापक चौधरी, दत्तात्रय मुठे, पोस्टमन गवळी, अक्षय ढोरे, चैतन्य पवार, सचिन शिंदे, गणेश दरेकर आणि पालकवर्ग उपस्थित होता.