यवत : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्काम आटोपून वरवंडकडे मार्गस्थ झाला. यावेळी लावणीसाठी प्रसिद्ध असलेल्या चौफुला (वाखारी) येथील न्यू अंबिका कला केंद्र येथे टाळ मृदंगाचा तालावर, ज्ञानोबा तुकाराम गजर करत भक्तीगीत व घुंगरांचा छन-छनाटासह लावणीचा अनोखा संगम वारकऱ्यांनी याची देही याची डोळा अनुभवला.
घुंगराचा छनछनाट अन् टाळ मृदुंगाच्या नादासोबत भक्तीमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदी याची देही याची डोळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
पालखी सोहळ्यात अनेक संस्था, संघटना चहा, बिस्कीट व अल्पपोहाराची सोय करतात. मात्र चौफुला येथील प्रसिद्ध कला केंद्रातील नृत्यांगनांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून वारकऱ्यांमार्फत आपली सेवा विठ्ठल- रुक्मिणी चरणी पोहचविली. हा एक अनोखा उपक्रम दरवर्षीप्रमाणे सादर करतात. यावेळी या नृत्यांगणांनी विठुरायाच्या भक्ती गीतांवर टाळ मृदुंगाच्या गजरात ताल धरत सोबतच लावणीही सादर केली. जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला. या जुगलबंदीमुळे वारकऱ्यांचा काही अंशी थकवाच निघून गेला.
चौफुल्यातील रोजची सायंकाळ लावणीच्या संगीताच्या साथीने मावळते. पण आषाढात हे चित्र थोडं बदलतं. देहूवरून पंढरपूरकडे जाणारी तुकाराम महाराजांची पालखी इथून जाते. यावेळी लावणी कलावंत स्वतःच्या हातानं वारकऱ्यांना जेवू घालतात व त्यांच्या मनोरंजनासाठी खास कार्यक्रमही करतात.
दरवर्षी आषाढ सुरू झाला, की येथील नृत्यांगनांनाही वारीचे वेध लागतात. “आपण पंढरपूरला वारी बरोबर जाऊ शकत नाही पांडुरंग वारकऱ्यांच्या रूपाने आपल्याकडे येतात असे वाटत असल्याचे येथील नृत्यांगना सांगतात.
टाळ आणि चाळ ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची दोन वेगवेगळी प्रतीकं आहेत. दोन्हीचा साज आणि बाज अगदी वेगळा आहे. पण वारीच्या निमित्तानं दरवर्षी चौफुल्यात दोन्हीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. गेल्या अनेक वर्षांपासून या न्यू अंबिका कलाकेंद्राच्या नृत्यांगना वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात. गेल्या 31 वर्षाची परंपरा डॉ. अशोक जाधव व जयश्री जाधव त्यांनी आजही कायम जपली आहे.
पालखी स्वागताचे 32 वे वर्ष असून यावेळी 10 हजार वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती अंबिका कला केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक जाधव यांनी दिली, कला केंद्रातील लावणी कलाकारांकडून पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना जेवण देण्यात आले सोबतच वारकऱ्यांसमोर आपली कलाही सादर केली.
यावेळी कला केंद्राच्या संचालिका जयश्री जाधव यांनी बोलताना म्हणाले, राज्यात चांगला पाऊस पडू दे, ईडा पीडा टळू दे आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे, प्रत्येकाला सुख, समृद्धी लाभू दे आणि सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो अशी प्रार्थना पांडुरंगा चरणी केली. तर दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी येतात, तेव्हा खूप बरं वाटतं.
आम्हाला दसरा दिवाळी सणांसारखा खूप आनंद होतो. वारकरी बांधवांना आम्ही स्वतः हातानी महाप्रसाद वाढतो, तेव्हा साक्षात पांडुरंगाला भेटल्यासारखं वाटते, असे येथील नृत्यांगना वैशाली वाफळेकर व संगीता काळे यांनी सांगितले. यावेळी रेश्मा नगरकर, आशा केसकर, प्रिया नगरकर, दुर्गा रुईकर यांसह 20 पेक्षा अधिक नृत्यांगना उपस्थित होत्या.