उरुळी कांचन, (पुणे) : वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे।। जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजें यज्ञकर्म।। हा श्लोक म्हणत लाखो वारकरी बांधव अन्नाचा घास घेतात. वारी काळात वारकऱ्यांसाठी अनेक ठिकाणी अन्नदान केले जाते. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील असेच एक कुटुंब व कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने मागील अनेक दिवसांपासून वारकऱ्यांसाठी अन्नदान केले जात आहे.
उरुळी कांचन येथे दुपारी पालखीचा विसावा असल्याने उरुळी कांचन येथील सामाजिक कार्यकर्ते व कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, त्यांचे कुटुंबीय व सहकारी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी दिवशी दिंडीतील वारकऱ्यांसाठी जेवनाची सोय मागील अनेक दिवसांपासून करीत आहेत.
कस्तुरी प्रतिष्ठानच्या ‘बेताने’ वारकरी प्रफुल्लित..!
समाजसेवा व सामाजिक कार्याची मोठी ओढ असलेल्या उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी यंदाही खास चविष्ठ अन्नदानाचा बेत ठेवला होता. यंदा प्रतिष्ठानने वारकऱ्यांच्या सेवेसाठी शुद्ध ऊसाचा रस उपलब्ध केला होता. उन्हामुळे लाहीलाही झालेल्या वारकऱ्यांसाठी हा ऊसाचा रस आधार देत होता. ऊसाच्या रसासहीत पिठलं भाकर, भाजी, शिरा, मसाले भात तसेच आदी स्वादिष्ट भोजनाने वारकरी समाधानी झाले.