पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेच्या छोट्या बहिणीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.30 जून) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील मेंटल हॉस्पिटलच्या मोकळ्या मैदानात घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
याबाबत 51 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून हुसेन अस्लम खान, आमिर अस्लम खान, अस्लम हैदर खान, शोएब रशीद कुरेशी, वीरेन वाघेला, स्टीफन जाॅन्सन शिरसाठ (सर्व रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, किक्रेट खेळताना आरोपींचा विल्सन मरिअन याच्याशी वाद झाला. या वादातून त्यांनी विल्सनला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तक्रारदार महिला आणि तिची छोटी बहीण, तसेच हरीश बबन काळे, यशवंत बबन काळे यांनी भांडणात मध्यस्थी केली. त्यावेळी आरोपी आमिर खान याने घरातून कोयता आणून आरोपींनी हरीश काळे यांना कोयत्याच्या दांड्याने बेदम मारहाण केली.
यशवंत काळे यांच्या खांद्यावर कोयत्याचा दांडा मारला. तसेच आरोपींनी तक्रारदार महिलेच्या छोट्या बहिणीशी अश्लील कृत्य केले. त्यावेळी महिलेच्या दोन मुली तेथे आल्या. त्या दोन मुलींनाही आरोपींनी मारहाण केली. एवढंच नाही तर, पोलिसांकडे तक्रार केली तर जिवे मारू, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक तुषार दोडमिसे अधिक तपास करत आहेत.