पुणे : पुणेकरांना दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात होणाऱ्या संतधार पाऊस पडत असल्याने धरणात पाणीसाठा वाढला आहे. आता खडकवासला धरणात साडे चार टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. या धरणातून पुणे शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होत असतो. खडकवासला धरण प्रकल्पात 4.35 टिएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे शहरातील पाणी कपातीचे संकट सद्या टळले आहे.
पुण्यातील चार धरणातील पाणीसाठा..
पुणे शहर आणि जिल्ह्याला चार धरणांनी पाणी पुरवठा होतो ज्यामध्ये खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेत यांचा समावेश आहे. सध्या चारही धरणं मिळून एकूण 4.35 टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणातील पाणीसाठा (टक्केवारी)
- खडकवासला: 41.01 टक्के
- टेमघर: 3.05 टक्के
- वरसगाव: 10.39 टक्के
- पानशेत: 19.67 टक्के
जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस?
मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे.