केडगाव (पुणे) : महाराष्ट्रातील संतांनी जिथे वास्तव्य केले, जिथे जन्म झाला ती भूमी पवित्र झालेली आहे. त्यातीलच एक संतराज महाराज पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली आहे. यावेळी टाळ-मृदुंगाच्या साथीने संपूर्ण परीसरात “पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल”असे वातावरण निर्माण झाले होते.
श्रीक्षेत्र संगम येथील संतराजमहाराज पालखीचे आषाढी वारीसाठी मंगळवार (ता.02) रोजी पावसाच्या सरीत प्रस्थान झाले. पावसाच्या सरी, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी, पताकावाले यांनी धरलेला ठेका हे पाहून भक्तांचे डोळे दिपून गेले. मुळा-मुठा व भीमा नदी यांच्या संगमावरील पुलावर पालखी सोहळा कोंडेवस्तीकडे येताना वारकरी पैलतीरावर बसून डोळ्यांमध्ये ते पालखी सोहळ्यातील दृश्य साठवत होते. या सोहळ्यामध्ये पहिल्याच दिवशी सुमारे 10 हजारांच्यावर भाविक सहभागी झाल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.
आज सकाळी सोहळ्यानिमित्त संगमेश्वराचा अभिषेक झाला. त्यानंतर पालखी, पादुका, मानाचा अश्व, संगमेश्वर यांचे पूजन करण्यात आले. पालखीरथाची आकर्षक अशी फुलाची सजावट मच्छिंद्र अडागळे यांनी केली आहे. पावसासाठी साकडे घालून वारकरी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यावर्षी भरपूर पाऊस पडू दे व शेतकरी दुष्काळमुक्त होऊ दे, असे साकडे वारकऱ्यांनी पांडुरंगास प्रस्थानावेळी घातले. सोहळा संगम येथून निघाल्यानंतर मजल दरमजल करीत सोहळा न्याहरीसाठी कोंडेवस्तीवर विसावला. कोंडे परिवाराच्यावतीने 5 क्विंटल खिचडीवाटप करण्यात आली. सोहळा अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर देलवडीकडे मार्गस्थ झाला. देलवडी ग्रामस्थांनी रांगोळी, पायघड्या व स्वागतकमानी उभारून सोहळ्याचे स्वागत केले. हा सोहळा मुक्कामासाठी एकेरीवाडी येथे स्थिरावला.
या कार्यक्रमासाठी शांतिनाथ महाराज, रमेश थोरात, रंजना कुल, सुरेश महाराज साठे, विकास शेलार, नामदेव ताकवणे, अप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, सयाजी ताकवणे, माऊली ताकवणे, शिवाजी वाघोले, पोपटराव ताकवणे आदी मान्यवर व संतराज देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ वारकरी उपस्थित होते.