Anant -Radhika Wedding : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. मात्र, या सोहळ्या आधी अंबानी कुटुंबीयांनी वंचित जोडप्यांसाठी शाही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.
वंचित जोडप्यांचा शाही सामुदायिक विवाह सोहळा आज 2 जुलै दुपारी 4.30 वाजता पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे पार पडणार आहे. या सोहळ्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. अनंत आणि राधिका यांच्या लग्नापूर्वी त्यांनी वंचित जोडप्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा विवाह सोहळा देखील जंगी होणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून अंबानी कुटुंबीयांनी सामाजिक भान देखील जपले आहे.
हा सामुहिक विवाह सोहळा अनंत अंबानी व राधिका मर्चट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचा भाग असणार आहे. या सामुहिक लग्न सोहळ्याला संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित राहणार आहेत. या लग्न सोहळ्याची पत्रिकाही समोर आली असून ती सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्न करणार आहेत. या जोडप्याचं लग्न जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तीन दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 12 जुलै रोजी शुभ विवाहानं होईल. यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी भव्य स्वागत समारंभ होणार आहे.