लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर उरुळी कांचनसह परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना पुन्हा होर्डिंग लावण्यात आले आहेत. पुणे – सोलापूर महामार्गावर असलेले होर्डिंग हे सर्व परवानगीविनाच आहेत, हे स्पष्ट झाले असूनही या होर्डिंगवर कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही.
पुणे – सोलापूर महामार्गावरून जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जाणार आहे. या सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी असतात. अशावेळी या होर्डिंगवर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, एकाही होडिंगवर कारवाई करण्यात आली नाही. उलट दोन महिन्यांनंतर चक्क पुन्हा काही जाहिराती झळकू लागल्या आहेत, त्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाने अनेक सुरू केलेल्या मोहिमेबाबत सक्रियता दिसून येत नाही. एखादी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर येताना दिसत आहे. होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात एजन्सी वर्षाकाठी लाखो रुपयांचा मलिदा कमवतात. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून हा व्यवसाय चालत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे, मुंबईत होर्डिंग कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटना घडल्यानंतर काही मोजके दिवस कारवाईचा फार्स होतो, त्यानंतर होर्डिंगकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होते.
दरम्यान, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे महाकाय होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले होते. तर एका घोड्याला किरकोळ मार लागला होता. मात्र, या घटनेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत व धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जचा सुळसुळाट
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेली होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीची ठरत असून, या होर्डिंग्जमुळे प्रवासी, पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, पंधरा नंबर, शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, माळी मळा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी चौक, नायगाव फाटा, पेठ वाकडा पूल, सोरतापवाडी फाटा, इनामदारवस्ती, एलाईट चौक, तळवाडी चौक व खेडेकर मळा या परिसरात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत. मात्र त्यांच्यावर अद्यापपर्यत कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळत आहे.