मुंबई : नीट पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारला विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. पेपर फुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कठोर कायदा करावा अशी मागणी विरोधकांनी केली तर. तर पेपर फुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचं असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.
रोहित पवार म्हणाले की, पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी आम्ही आंदोलन, उपोषण केले. महाराष्ट्र राज्य पेपरफुटीचा कायदा या अधिवेशनात काढणार का? असा सवाल रोहित पवार यांनी केला. तसेच सार्वजनिक भरतीचे पेपर फुटले आहेत. केंद्र सरकारने जो कायदा आणला त्याचे स्वागत आहे.
मात्र, त्यातही काही त्रुटी आहेत. या अधिवेशनात पेपर फुटीचा कायदा आणला जावा. हा युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. आम्ही चुकीचं काही बोलत नाही. गृहमंत्री बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आली ती अपुरी आहे, असं सांगत रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील मृदा आणि जलसंधारण खात्याच्या परीक्षांच्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. अशी भरती झाली तर कसं व्हायचं. पेपर फुटीविरोधात तातडीने कायदा करून आरोपींना दहा वर्षांच्या शिक्षेची तरतुद ठेवा. कोणीही बडा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.
दरम्यान, रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिल आहे. तलाठी परीक्षेच्या भरतीत पेपर फुटलाच नाही. उत्तर चुकलं म्हणून ती भरती रद्द केली. आता टीसीएस केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. ७५ हजारांची भरती घोषित करण्यात आली. ५७,५५२ लोकांना नियुक्ती देण्यात आली आहे. अजून १९८५३ लोकांना नियुक्ती देणं बाकी आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.