रांजणगाव : शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे एका तरूणाने मैत्रिणीच्या घरात सलवारच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २८ जून रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. श्रीराम झूलन भगत कुशावत (वय-४१, रा. बिहार) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम हा मुळचा बिहार येथील राहणारा आहे. तो काही वर्षापूर्वी कुटुंबासह वाळूज महानगरात कामानिमित्त आला होता. श्रीराम याने पतीपासून विभक्त राहणाऱ्या त्याच्या गावाकडील मैत्रिणीला कंपनीत कामाला लावून देतो असे सांगितले होते. त्यावरून तिच्या चार मुलांना सोबत घेऊन ती वाळूज महानगरात राहण्याकरिता आली होती.
दरम्यान, रांजणगावामध्ये भाड्याने खोली घेऊन ती राहत होती. तसेच वाळूज येथील एका कंपनीत ती काम देखील करत होती. श्रीराम हा दररोज तिला कंपनीत नेऊन सोडायचा. गुरुवारी २७ जून रोजी रात्री श्रीराम हा मैत्रीणीच्या घरी गेला होता. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या मैत्रिणीला श्रीराम हा घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.