पुणे : जुन्नर तालुक्यात एक मन्न सुन्न करणारी घटना घडली आहे. त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती. त्याला शाळा आणि गाव मिळणार याच्या आनंदात तो कोल्हापुरामध्ये आला. जिल्हा परिषदेची ही समुपदेशन प्रक्रिया सरकारी विश्रामगृहामध्ये सुरू असल्याने तिथे तो मित्रांसह पोहोचला.
हाती नोकरीची ऑर्डर आणि जीवनातील अत्यानंदाचा क्षण, नेमकं त्याच वेळी दुपारी मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज पाहून एकाच वेळी हसू आणि आसू अशी स्थिती निर्माण झाली. एकीकडे काही वेळात हातात नोकरीची ऑर्डर, तर दुसरीकडे वडील गेल्याचे दुःख.
जुन्नर तालुक्यातील हरिभाऊ विरणक या शिक्षकाचे वडील गेल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना समजताच त्यांनी त्याच्या पाठीवर हात फिरवत जवळ घेत विरणक यांना मानसिक आधार दिला. मग मात्र त्यांना गहिवरून आले आणि अश्रूंचा बांध फुटला. पद व अधिकारपदाची झूल बाजूला ठेवत माणुसकीचे दर्शन घडविले. तसेचे शिक्षकाचे सात्वंन करून वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली.
नेमकं काय घडल?
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुरुवारी 27 जून रोजी सर्किट हाऊस येथे शिक्षक भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापनासाठी बोलावले होते. ही प्रक्रिया सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिक्षक हरीभाऊ दिगंबर विरणक यांच्या वडिलांचे निधन झाल्याची दुखःद बातमी त्यांना समाजली.
हे समजताच शिक्षक विरणक यांना मोठा धक्का बसला, काही सुचेनासे झाले. शिक्षक म्हणून पदस्थापना मिळणार होती आणि हातात नोकरीची ऑर्डर. त्यांनी सभागृहाबाहेरील अधिकाऱ्यांना, वडिलांच्या निधनाची कल्पना दिली. जिल्हा परिषद प्रशासन आणि उपस्थित सर्व नवनियुक्त शिक्षकाच काळीज हेलावून गेलं. अधिकाऱ्यांनी तत्काळ सीईओ कार्तिकेयन यांना कळविले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ त्या शिक्षकाला भेटण्यासाठी सभागृहाबाहेर आले. सीईओना पाहताच त्या शिक्षकाला अश्रू अनावर झाले. सीईओंच्या खांद्यावर डोकं ठेवत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. सीईओंनी त्या शिक्षकाचे सांत्वन करून धीर दिला.
आणि त्यांना स्वतःच्या गाडीतून पोहचविण्याचे नियोजन केले. पुढे त्याच्या पदस्थापननेची प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, सीईओ कार्तिकेयन एस यांनी दाखविलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि तत्परता या सर्व गोष्टी मात्र, उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या.