Maharashtra Budget 2024 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून (दि. २७) सुरुवात झाली आहे. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार आता पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार असल्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोगांच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी असल्याचे अजित पवार म्हणाले.
तसेच एलीपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित मानला जातो. त्यामुळे याचा वापर वाढवणे गरजेचे आहे, असा आमचा प्रयत्न आहे. गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र असलेल्या कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ मी या अर्थसंकल्पात जाहीर करत असल्याचे अजित पवार म्हणाले.
ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना म्हणाले कि, राज्यात ६ लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत आहेत. त्याची संख्या ७ लाख करण्यात येईल. आणि त्यांच्यासाठीच्या निधीची रक्कम १५ हजाराहून ३० हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.