शिक्रापूर : शिरूर शहरातील बाजार समिती आवारात शेतातील काकडी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याला जुन्या भांडणाच्या वादातून हत्याराने बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत कैलास भाऊसाहेब शेळके (वय ४२, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी आशिष संपत थेऊरकर, संपत जयवंत थेऊरकर (रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांसह आठ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
बाजार आवारात कैलास शेळके हे आले असताना त्यांच्या गावातील आशिष थेऊरकर व काही इसमांनी कैलास यांना गावातील जुन्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. धारदार हत्यार घेऊन कैलास यांच्या पायावर मारून जखमी केले. तसेच यावेळी मारहाण करणाऱ्या अन्य लोकांनी तू गावातच कसे राहतो, ते बघतो अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश आगलावे हे करत आहेत.