उमरखेड : सावळेश्वर येथील पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींसह एका मुलाचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सावळेश्वर येथे आज २६ जून रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अवंतिका राहुल पाटील (वय-१३, सावळेश्वर), कावेरी गौतम मुनेश्वर (वय-१५, रा. बाभळी, ता. हदगाव), चैतन्य देवानंद काळबांडे (वय-१७, रा. सावळेश्वर) अशी नदीच्या डोहात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर शुभम सिद्धार्थ काळबांडे (वय२२, रा. सावळेश्वर) हा अत्यवस्थ असल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सावळेश्वर गावाजवळ असलेल्या नदीपात्रात कपडे धुण्यासाठी अवंतिका पाटील आणि कावेरी मुनेश्वर गेल्या होत्या. कपडे धुवून झाल्यानंतर पोहण्यासाठी त्या नदीपात्रात उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघीही बुडू लागल्या. त्यावेळी नदीच्या तीरावर उभे असलेल्या चैतन्य काळबांडे आणि शुभम काळबांडे यांना त्या दोघी बुडताना दिसल्या. त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी चैतन्य आणि शुभमने नदीत उड्या घेतल्या. मात्र, त्यांना देखील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघही बुडू लागले.
त्यावेळी तेथील महिलांनी गावाकडे धाव घेत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणांनी नदीकडे धाव घेतली. मात्र, कावेरी मुनेश्वर हिचा जागीच मृत्यू झाला. तर अवंतिका व चैतन्य यांना उपचारासाठी घेवून जात असताना त्यांचा मृत्यू झाला. तर शुभम काळबांडे हा अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.