पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समतावादी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मैत्री प्रकाशनचे प्रमुख दयानंद कनकदंडे यांनी फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी २५ जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दिघी येथे घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्री प्रकाशनचे प्रमुख दयानंद कनकदंडे हे दिघी येथील एका सोसायटीत राहत होते. समतावादी चळवळीतील सक्रिय सदस्य म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान, मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कनकदंडे यांनी दिघी येथील त्यांच्या बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीतून उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली.
दयानंद कनकदंडे यांच्या मागे पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. दरम्यान, कनकदंडे यांच्या अचानक जाण्याने चळवळीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाबाबत दिघीचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ म्हणाले की, घटनास्थळी केलेल्या पहाणीनंतर प्रथमदर्शनी दयानंद यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येत असून सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू असल्याचे ढमाळ म्हणाले.
कनकदंडे यांच्या मृत्युनंतर सोशल मीडियावर तर्कवितर्क
दयानंद कनकदंडे यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तर्कवितर्क लावले जात आहेत. काही वापरकर्त्यांनी दयानंद यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाल्याचे म्हटले आहे. तर काहींनी त्यांच्या मृत्युच्या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे.