सोलापूर : यंदा 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने वारकर्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर मध्ये मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. 2 जून पासून विठूरायचं थेट पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे तर 7 जुलैपासून आषाढी यात्रेसाठी पांडुरंगाचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे.
आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या यात्रेतील शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औसेकर महाराजांच्या हस्ते विणा, वाकरी पटका, श्रींची मुर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावर्षी 17 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे. दरम्यान, विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठुरायाचे दर्शन 24 तास खुले केल्यामुळे भाविकांच्या आनंदात आणखीन वाढ झाली आहे.